ठळक घडामोडी

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

निरवडे (सावंतवाडी):

सावंतवाडी तालुक्यातील निरवडे रेल्वे स्टेशन परिसरातील ‘सिल्व्हर एकर’ या निवासी संकुलात काल एका चार फूट लांबीच्या मगरीने शिरकाव केल्याने खळबळ उडाली. मानवी वस्तीत, विशेषतः इमारतीच्या अंगणात मगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, सावंतवाडीच्या आर.आर.टी. (RRT) टीमने तातडीने धाव घेत या मगरीला सुरक्षितपणे जेरबंद केले.

निरवडे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या सिल्व्हर एकर इमारतीच्या तळमजल्यावर एका बंद घराच्या बाजूला असलेल्या अंगणात ही मगर बसली होती. इमारतीतील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांची भंबेरी उडाली. भरवस्तीत आणि घरांच्या इतक्या जवळ मगर आल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले होते.
आर.आर.टी. टीमची यशस्वी मोहीम
या घटनेची माहिती तातडीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमला देण्यात आली. माहिती मिळताच बबन रेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह आर.आर.टी. टीम सावंतवाडीचे बबन रेडकर व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या टीमने सुमारे चार फूट लांबीच्या या मगरीला पकडून जेरबंद केले.

“भर वस्तीत मगर फिरू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते, परंतु टीमने वेळेत येऊन मगरीला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला,” असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.

नागरिकांनी मानले आभार
मगर पकडल्यानंतर सिल्व्हर एकरमधील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि समाधान व्यक्त केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जवळील जलाशयांमुळे अशा प्रकारे वन्यजीव मानवी वस्तीत येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.