ठळक घडामोडी

भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया युनिट इमारतीचे तीन नेमळे येथे उत्साहात भूमिपूजन

भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया युनिट इमारतीचे उत्साहात भूमिपूजन

सावंतवाडी | प्रतिनिधी :
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) व स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनमोल प्रभागसंघ तळवडे कार्यक्षेत्रातील भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, मळगाव यांच्या काजू प्रक्रिया युनिट (2 TPD) इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी, दि. २१ जुलै २०२६ रोजी नेमळे-पेंडूरकरवाडी (ता. सावंतवाडी) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या नव्या इमारतीमुळे कंपनीच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असून महिला शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट उपप्रकल्पांतर्गत या काजू प्रक्रिया युनिटसाठी ५८.४० लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये ६० टक्के अनुदानाचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे भूमिपूजन सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, उमेद (MSRLM) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) इमारतीचे भूमिपूजन करण्याचा मान या प्रकल्पाला मिळाला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक अभिजित परब यांनी महिला शेतकऱ्यांना संघटित करून शेतीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया, साठवणूक आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. सभापती सुस्मिता जाधव यांनीही कंपनीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सावंतवाडीच्या बीएमएम स्वाती रेडकर, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, कंपनीच्या अध्यक्षा निकिता बुगडे, सचिव रुपाली गुडेकर, कोषाध्यक्ष मयुरी दळवी, तसेच संचालक विशाखा ठाकूर, रंजना तेली, दीपाली हरमलकर, हर्षदा पेडणेकर आणि मनाली परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, अनमोल प्रभागसंघाचे सर्व कॅडर आणि महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी कंपनीच्या सचिव रुपाली गुडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.