सावंतवाडी :
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार गायकवाड यांच्याकडे केली. सावंतवाडी टर्मिनस पूर्ण झाल्यास कोकणातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि रेल्वे वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, ठाणे विभाग संघटक प्रसन्न कलमस्टे, उल्हासनगर विभाग समन्वयक दर्शन नाईक तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेने भविष्यातही कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.







