वेंगुर्ला | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम – वर्ष पाचवे’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. १८ जुलै) साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे उत्साहात पार पडला. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाचा सहभाग या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, विद्यमान सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या साक्षी नार्वेकर व शीतल राऊत, राज्य प्रतिनिधी दादा जांभवडेकर, सचिन मदने, प्रशांत मडगावकर, संतोष परब, राजू वजराटकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, पतपेढी जिल्हाध्यक्ष सिताराम लांबर, संचालिका ऋतुजा जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी कोथमिरे तसेच शिक्षण, प्रशासन आणि शिक्षक संघटनेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यक शालेय शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांच्या पाल्यांचा, निवृत्त शिक्षकांचा तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी आकस्मिक निधी उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, प्रत्येक सक्षम व्यक्तीने किमान एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यास कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा संदेश दिला.
कार्यक्रमात शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट नियोजन, सामाजिक उत्तरदायित्व आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रकर्षाने दिसून आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा उपक्रम वेंगुर्ला तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका सचिव रामा पोळजी यांनी केले. सूत्रसंचालन ऋतिका राऊळ यांनी केले, तर राजू वजराटकर यांनी आभार मानले. “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.







