
सावंतवाडी, १७ नोव्हेंबर:
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा अतिशय उत्साहात शुभारंभ केला.
प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सावंत-कविटकर यांनी शहरातील मुरलीधर मंदिर तसेच हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून आणि साकडे घालून देवाचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या सौ. कविटकर यांनी प्रचारात आधीच आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या महत्त्वपूर्ण शुभारंभप्रसंगी त्यांच्यासह प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार अनारोजीन लोबो आणि सुरेंद्र बांदेकर यांनीही श्रीफळ वाढवून आपापल्या प्रभागातील प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ केला.
कार्यक्रमाला शिवसेनेचे शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शिवसेनेचे अन्य नगरसेवक उमेदवार तसेच मोठ्या संख्येने निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेच्या प्रचाराला पहिल्याच दिवशी मोठी ऊर्जा मिळाल्याचे दिसून आले.







