ठळक घडामोडी

निरोगी माती आणि बंपर उत्पादनासाठी ‘गोकृपा अमृतम्’चा वापर करा; उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांचे आवाहन

होडावडा (प्रतिनिधी):
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवणे आणि पिकांना आवश्यक अन्नघटक मिळवून देणे गरजेचे आहे. हेच काम ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण करते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे द्रावण घरच्या घरी बनवून वापरावे, ज्यामुळे उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अनिकेत कदम यांनी केले.
होडावडा येथील प्रगतशील शेतकरी श्री. मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये कृषी विभागातर्फे ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण तयार करण्याचे, तसेच बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याप्रसंगी श्री. कदम बोलत होते.

या कार्यक्रमात कृषी सहाय्यक श्री. पंकज पाटील यांनी गोकृपा अमृतम् द्रावणामध्ये प्रक्रिया केलेले बियाणे आणि प्रक्रिया न केलेले बियाणे यांमधील फरक प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना दाखवून दिला. तसेच, मंडल कृषी अधिकारी श्री. शंकर नाईक यांनी बागेतील झाडांना जैविक आच्छादन (मल्चिंग) कसे करावे, याचे महत्त्व सांगून बागेतील नारळाच्या झाडाला जैविक आच्छादन करून दाखवले.

माणगावकर यांच्या बागेतील नाविन्यपूर्ण उपक्रम

बागेचे मालक श्री. मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या बागेत राबवलेल्या विविध पर्यावरणपूरक व सेंद्रिय उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये प्रामुख्याने:कीड नियंत्रणासाठी रक्षक सापळेकृत्रिम अंडी उबवणूक पेटी,कल्की द्रावण निर्मिती नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी बेडूक संवर्धन,
जमीन सुपीकतेसाठी गांडूळ खत प्रकल् ,शेतकऱ्यांना मोफत द्रावण वितरण असे उपक्रम सुरू आहे

माणगावकर यांच्या बागेत तयार झालेले ‘गोकृपा अमृतम्’ द्रावण गावातील सर्व शेतकरी आणि बागायतदारांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी हे द्रावण नेऊन स्वतःच्या घरी त्याची अधिक निर्मिती करावी आणि शेती व बागेत त्याचा वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

या प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे कृषी अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रमुख शेतकरी प्रमोद दळवी, सुनील सावंत, श्रीकृष्ण कोंडुस्कर, विनोद नाईक, संदीप सातार्डेकर, पराग सावंत, प्रशांत नाईक, यशवंत परब, अर्जुन सावंत, सुनील वालावलकर, महादेव दळवी तसेच सौ. योगिता परब, सौ. अदिती नाईक, सौ. श्रिया माणगावकर, साक्षी नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली.