तळवडे (प्रतिनिधी):
सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने परिसरासाठी एक ‘शित शव पेटी’ (Freezer Box) समर्पित करण्यात येत असून, याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
२८ जून रोजी होणार लोकार्पण सोहळा
हा लोकार्पण सोहळा रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता ‘श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय’ (तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे संपन्न होणार आहे. मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण भागात अनेकदा अशा शित शव पेटीची तातडीने गरज भासते. हीच गरज ओळखून या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या लोकहितोपयोगी उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शित शव पेटीची पुढील व्यवस्था ‘शुभांगी क्लिनीक, डॉ. कांडरकर, तळवडे’ (ता. सावंतवाडी) यांच्याकडे असणार आहे. गरजूंना ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मोबा. ९०१११६१६२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“एक सामाजिक आणि सेवाभावी कार्य म्हणून आम्ही ही शित शव पेटी तळवडे व परिसरातील जनतेसाठी समर्पित करत आहोत,” अशी भावना १० वी १९८७ बॅचच्या निमंत्रकांनी व्यक्त केली आहे. या उद्घाटन प्रसंगी आणि लोकार्पण सोहळ्यास तळवडे परिसरातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी आणि हितचिंतकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ‘श्री जनता विद्यालय तळवडे’च्या १० वी १९८७ बॅचच्या वतीने करण्यात आले आहे.







