सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी
सावंतवाडी: राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला गड राखला आहे. भाजपचे उमेदवार अॅड. अनिल निरवडेकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा ५ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. या विजयामुळे सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
निवडणुकीचा निकाल: एका नजरेत
आज पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतांचे गणित स्पष्ट झाले. निवडणुकीचा निकाल खालीलप्रमाणे राहिला:
अॅड. अनिल निरवडेकर भाजप यांना १२ मते पडली तर अजय गोंदावळे यांना शिवसेना पक्ष ७ मते पडल्याने पराभूत व्हावे लागले.
काँग्रेसचे तौकीर शेख आणि उबाठा शिवसेनेचे देवेंद्र टेमकर हे मतदानावेळी तटस्थ राहिले.
निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय घडामोडी
सकाळी नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या उपस्थितीत निरवडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेकडून अजय गोंडावळे यांनी आव्हान उभे केले होते, मात्र भाजपच्या १० नगरसेवकांनी आणि श्रद्धराजे भोसले नगराध्यक्षांनी एकजुटीने निरवडेकर यांच्या बाजूने कौल दिला.
स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड
याच प्रक्रियेदरम्यान रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य जागांचीही घोषणा करण्यात आली.
यामध्ये पक्षीय तडजोडीनुसार पुढील दोन नावांची बिनविरोध निवड झाली अॅड. सिद्धार्थ भांबुरे (भाजप) व अॅड. नीता कवीटकर (शिवसेना)
“शहराच्या विकासासाठी कटिबद्ध” – अॅड. अनिल निरवडेकर
विजयी झाल्यानंतर अॅड. निरवडेकर यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.”
भाजपचा जल्लोष
निकाल जाहीर होताच नगरपरिषद परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, विनोद राऊळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि समर्थकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले.







