सावंतवाडी, दि. ७ सप्टेंबर (प्रतिनिधी) : विवाह नोंदणी करताना ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेकडून महिलांच्या केवळ लग्नानंतरच्या म्हणजेच सासरच्या नावाची नोंद केली जाते. मात्र महिलांची शैक्षणिक तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे माहेरच्या नावाने असल्याने नाव बदलण्यासाठी त्यांना गॅझेट करावे लागते. यामुळे महिलांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे विवाह नोंदणीच्या दाखल्यावर लग्नापूर्वीचे (माहेरचे) आणि लग्नानंतरचे (सासरचे) अशी दोन्ही नावे नमूद करण्यात यावीत, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात रूपेश राऊळ यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जयप्रकाश परब तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी जयप्रकाश परब यांच्याशी चर्चा करताना राऊळ म्हणाले की, राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे अशा दोन्ही नावांचा उल्लेख करून दाखले दिले जातात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप ही पद्धत लागू करण्यात आलेली नाही.
महिलांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांसह विविध शासकीय व महत्त्वाच्या कागदपत्रांवर माहेरचे नाव असते. विवाहानंतर केवळ सासरच्या नावाची नोंद असलेला विवाह दाखला मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी नाव बदलाची प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी गॅझेट तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने महिलांना अनावश्यक त्रास आणि आर्थिक खर्च सहन करावा लागतो.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन विवाह प्रमाणपत्रावर माहेरचे व सासरचे दोन्ही नाव नमूद करण्याची व्यवस्था लागू करावी, अशी मागणी राऊळ यांनी केली. ही सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या मागणीवर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले.








