
मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात
एक हजार वर्षांची परंपरा
धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण
सावंतवाडी :
विठ्ठल नामाच्या जयघोषात एक हजार वर्षाहूनही अधिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील दीड दिवसीय सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात गावातील मानकरी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. गणेश पूजन, घाट धुपारत, पाराची भजने, दिंडी, गोपाळकाला, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी रवळनाथ मंदिर परिसरात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती.
दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला मळगाव येथील रवळनाथ मंदिरात सात पाराचा हरिनाम सप्ताह साजरा होत असतो. काल शुक्रवारपासून हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव रवळनाथ देवाला वस्त्रालंकारांनी सजविण्यात आले होते. ब्राम्हणांच्या साक्षीने व राऊळ-गावकर मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ व गणेश पूजनाने तसेच घाट धुपारत करून हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. यावेळी पेटी, तबला, पखवाज, टाळ, चिपळी, वीणा, समई आदी वाद्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर पाराच्या भजनाला सुरुवात झाली.
ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने सादर
हरिनाम सप्ताहाच्या दोन दिवस अगोदर रवळनाथ मंदिरात गावातील भजन मंडळांना बोलावून जेवढे भजन मंडळ येतील तेवढ्या नंबरांच्या चिट्ट्या काढल्या जातात. चिट्टीवरील जो नंबर ज्या मंडळाला येईल त्या नंबराप्रमाणे भजन मंडळांना पार म्हणजेच वेळ ठरवून दिला जातो. त्या ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे शुक्रवार सकाळी दहा वाजल्यापासून आज (शनिवार) दहा वाजेपर्यंत मळगाव येथील विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ-कुडववाडी, बाबी लातये निर्मित बाळ गोपाळ मंडळ तेलकाटावाडी, भूतनाथ भजन मंडळ, कुंभारवाडी, पाडगावकर भजन मंडळ-पाडगावकरवाडी, महापुरुष भजन मंडळ, सुतारवाडी, जय हनुमान भजन मंडळ, पिंपळवाडी, अष्टविनायक भजन मंडळ, कुंभारआळी, गणेश प्रसादी मंडळ, नाईकवाडी, मायापूर्वाचारी भजन मंडळ बादेकरवाडी, महापुरुष भजन मंडळ, जोशी मांजरेकरवाडी, राष्ट्रोळी भजन मंडळ वरची देऊळवाडी, इस्वटी भजन मंडळ रेडकरवाडी, धाव गिरोबा भजन मंडळ सावळवाडा आदी १३ वाडीतील भजन मंडळांनी ठरवून दिलेल्याप्रमाणे आपली भजने सादर केली. या भजनांचा मळगावातील भजनप्रेमींनी लाभ घेतला.
दिंडी गोपाळकाला व महाप्रसादाने सांगता
आज सकाळी ज्ञानदेव तुकाराम, विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोहीला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी विठू नामाच्या जयघोषात व ढोलांच्या गजरात भव्य अशी दिंडी काढून नारळ नदीत अर्पण करण्यात आला. त्यानंतर गोपाळकाला व महाआरती पार पडली. दुपारी रवळनाथ मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. अशा या दीड दिवसीय सात पाराच्या हरिनाम सप्ताहाची परंपरा गावातील मानकऱ्यांसह संपूर्ण मळगाव गाव श्रद्धेने व भक्तीभावे जोपासत आले आहे.







