विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर
विक्रांतने वडिलांचा वारसा पुढे चालवावा : आम्ही समर्थपणे पाठीशी
सावंतवाडी,
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी फार मोठे कार्य केले होते. विशेषतः भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळे विकासभाईंच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी सावंत कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या निकटच्या व कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला आणि विकासभाईंच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आ. केसरकर म्हणाले, कै. भाईसाहेब सावंत आणि विकासभाई सावंत यांच्याशी आपले अत्यंत निकटचे व कौटुंबिक संबंध होते. विकासभाई सावंत यांनी कधीही मंत्र्यांचा मुलगा असल्याचा बडेजाव केला नाही. ते एक साधे आणि समर्पित जीवन जगले. असे यावेळी मत व्यक्त केले







