ठळक घडामोडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करा! आमदार दीपक केसरकर यांची महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह मतदारसंघातील विविध रुग्णालयांमध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) पदे तातडीने भरावीत, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.

आमदार दीपक केसरकर यांनी आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या ‘सुरुची’ निवासस्थानी भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केसरकर यांनी केली.

तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रिक्त असलेली सर्व वैद्यकीय अधिकारी पदे लवकरात लवकर भरण्यात येतील, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी डायलिसिस यंत्रणा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता मिटला असून, रुग्णालयाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात होण्यासाठी विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंतीही आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.

या भेटीवेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग सचिन वालावलकर उपस्थित होते.