ठळक घडामोडी

इंधन दरवाढ व महागाईविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना (UBT) आक्रमक;माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा

कुडाळ : प्रतिनिधी

देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि इंधनाचा भासणारा तुटवडा याविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पायी मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा तीव्र निषेध केला.

सायकल हातात घेऊन अभिनव आंदोलन

हा मोर्चा ठाकरे शिवसेना शाखा ते गांधी चौक आणि तिथून परत राजमाता जिजाऊ चौकापर्यंत पायी काढण्यात आला. आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वतः हातात सायकल घेऊन, पायी चालत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. ‘एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे सरकार मात्र केवळ पोकळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे,’ असा घणाघाती आरोप यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वैभव नाईक यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले,

“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव सातत्याने वाढत असून रुपयाचा दर घसरत चालला आहे. पंतप्रधान डॉलरची ही घोडदौड आणि रुपयाची घसरण थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच इंधनासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने सर्वसामान्यांना इंधन मिळणे कठीण झाले आहे.”

वैभव नाईक यांनी आगामी शेती हंगामाबाबतही चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांचा हंगाम तोंडावर आला असताना शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज भासणार आहे. अशा स्थितीत इंधनच उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
महागाईसोबतच सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीचा विषयही त्यांनी लावून धरला. या पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोर्चात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा”, “कहा गये अच्छे दिन”, “पेट्रोल-डिझेल दरवाढ झालीच पाहिजे” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान सखी सैयां तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप्स ऐकवून ठाकरे शिवसेनेने सरकारवर कडाडून टीका केली.

या आंदोलनात माजी आमदार परशुराम उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर, योगेश धुरी, अर्चना बंगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
“वाढत्या महागाईच्या निषेधार्थ व जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले असून ही केवळ सुरुवात आहे. इंधन दरवाढ रद्द करण्यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करत राहू आणि सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी त्यांना भाग पाडू,” असा इशारा शेवटी वैभव नाईक यांनी दिला.