ठळक घडामोडी

आडाळी एमआयडीसीतील खनिज चोरी प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंतांचा दणका!सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन !२ दिवसांत कारवाईचे संकेत, प्रशासनात खळबळ

मुंबई

आडाळी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या खनिजयुक्त लाल मातीच्या बेकायदेशीर उत्खनन आणि चोरी प्रकरणाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेत थेट सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ चौकशी व कठोर कारवाईचे आदेश दिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे आणि निवेदन पाहिल्यानंतर मंत्री सामंत यांनी संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेच्या भूमिकेचीही चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दोडामार्ग तालुका शिवसेना प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रत्नागिरी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत आडाळी एमआयडीसीतील कथित खनिज चोरी, रखडलेला औद्योगिक विकास, ग्रीन झोनचा प्रश्न आणि महावितरणची रखडलेली कामे यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.

शिवसेना शिष्टमंडळाने सादर केलेली छायाचित्रे, पुरावे आणि घटनास्थळाची माहिती पाहिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या अवैध प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

आडाळी एमआयडीसी परिसरात रात्री-अपरात्री जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर खनिजयुक्त लाल मातीचे उत्खनन करून डंपरद्वारे वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित यंत्रणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे केवळ उत्खनन करणाऱ्यांवर नव्हे, तर त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

सरकारी जागेतील लाखो रुपयांच्या मातीची चोरी आणि वाहतूक सुरू असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अनेक वर्षे हा प्रकार सुरू असूनही कारवाई झाली नाही, यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद होते, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.

युवकांच्या रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने मंजूर करण्यात आलेल्या आडाळी एमआयडीसीला सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप एकही मोठा उद्योग सुरू झालेला नाही. सबस्टेशनसह अनेक मूलभूत सुविधा अपूर्ण असल्याने गुंतवणूकदार पुढे येत नसल्याची वस्तुस्थिती शिष्टमंडळाने उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

एमआयडीसीचा मूळ उद्देश स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र आजही शेकडो युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याने शासनाने तातडीने पायाभूत सुविधा पूर्ण करून उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

आडाळी एमआयडीसी ग्रीन झोनमध्ये असल्याने अनेक उद्योगांना आवश्यक परवानग्या मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार या भागात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला. एमआयडीसीवरील ग्रीन झोनचा शेरा हटवून औद्योगिक विकासासाठी ती खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच महावितरणची कामे काही घटकांकडून रोखली जात असल्याने अद्याप वीज सुविधा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पोलीस संरक्षणात हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

खासगी जमिनीवरील बेकायदेशीर उत्खननावर महसूल विभाग कारवाई करतो, तर एमआयडीसीच्या जागेतील उत्खननाबाबत एमआयडीसी प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्याने आडाळी एमआयडीसीतील कथित खनिज चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दोन दिवसांत कारवाईचे संकेत मिळाल्याने संपूर्ण दोडामार्ग तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागून राहिले आहे.

शिवसेना शिष्टमंडळात तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख बाबाजी (दादा) देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, विलास सावंत, विशांत तळवडेकर, सुनील गवस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.