ठळक घडामोडी

माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका; दोन महिन्यांत ३४ लाखांचा निधी मंजूर


माजगाव | प्रतिनिधी


माजगाव पंचायत समिती मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला आहे. माजगाव आणि सोनुर्ली येथील विविध विकासकामांसाठी त्यांनी तब्बल ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, त्यांच्या या कार्यतत्परतेचे संपूर्ण मतदारसंघातून कौतुक होत आहे.
जितेंद्र गावकर हे माजगाव मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. “जनतेने दिलेला विश्वास आणि प्रेमाची परतफेड केवळ विकासकामांच्या माध्यमातूनच होऊ शकते,” या भावनेतून त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत हा निधी खेचून आणण्यात यश मिळविले आहे. पालकमंत्री नितेश राणे व वरिष्ठ नेते मंडळी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे.
शाळेच्या इमारतीसाठी २४ लाखांचे कवच


सोनुर्ली येथील श्री माऊली मंदिरासमोरील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन श्री. गावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, जुन्या खोल्या निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


रस्ते विकासाला गती


शाळेसोबतच ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे यासाठी त्यांनी रस्त्यांच्या कामांकडेही लक्ष दिले आहे. माजगाव येथील ‘दळवी दुकान ते म्हालटकर वाडा’ या जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजगाव, सोनुर्ली आणि वेत्ये या तिन्ही गावांचा सर्वांगीण विकास साधण्यावर माझा मुख्य भर राहील. आगामी काळात जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा मानस आहे.”
— जितेंद्र गावकर (सदस्य, पंचायत समिती
)

अवघ्या दोन महिन्यांत ३४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने जितेंद्र गावकर यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरू केल्याची भावना मतदार व्यक्त करत आहेत.