
सावंतवाडी, ता. ७ (प्रतिनिधी):
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील ज्येष्ठ व्यापारी तथा सिद्धेश्वर कोल्ड्रिंकचे मालक श्री. अशोक वराडकर (वय ७१) यांचे आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच तळवडे परिसरात शोककळा पसरली असून व्यापारी, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
श्री. वराडकर हे तळवडे परिसरातील ज्येष्ठ व आदरणीय व्यापारी म्हणून परिचित होते. त्यांनी आपल्या व्यावसायिक कार्यातून अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. तसेच ते तळवडे व्यापारी संघाचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. व्यापारी संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यांच्या निधनाने व्यापारी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, भाऊ तसेच अन्य आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे..







