ठळक घडामोडी

आगीत सर्वस्व गमावलेल्या कुंभार कुटुंबाच्या मदतीला तळवडे बाजारपेठ मित्रमंडळ धावले!व्यापारी बांधवांनी दिला आर्थिक मदतीचा हात; इतरांनीही पुढे येण्याचे आवाहन

तळवडे :
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण फर्निचर, इस्त्रीसाठी आलेले कपडे, इतर साहित्य तसेच गणेशोत्सवासाठी जमवून ठेवलेली रोकड जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे ६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने कुंभार कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

कुंभार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेले दुकानच आगीत भस्मसात झाल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेची दखल घेत तळवडे बाजारपेठ मित्रमंडळातील व्यापारी व ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत कुंभार कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.संकटाच्या काळात व्यापारी बांधवांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

तळवडे बाजारपेठ मित्रमंडळाच्या माध्यमातून श्री. संदीप पेडणेकर (तळवडे व्यापारी संघ अध्यक्ष), श्री. पंकज पेडणेकर (माजी सभापती), श्री. सनम कासार, श्री. उमेश पालकर, श्री. राजकुमार गावडे, श्री. धोंडी जाधव (पोलीस पाटील), श्री. रोहन घाडी, श्री. रामचंद्र कुडाळकर, श्री. उदय परब (माजी अध्यक्ष), श्री. सुधीर गावडे, श्री. राजन काष्टे, श्री. सतीश कासार, श्री. केशव तुळसकर, श्री. बाबा परब, श्री. रवी मालवणकर, श्री. महेश वडाचेपाटकर, श्री. सुरेश वरडकर (ज्येष्ठ व्यापारी), श्री. अभिजित घाडी, श्री. गणेश कर्पे आणि श्री. देवदूत परब यांनी पुढाकार घेत कुंभार कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली.

यावेळी व्यापारी बांधवांनी सांगितले की, “विजय कुंभार हे अत्यंत कष्टाने आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या कठीण प्रसंगी त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी व्यापारी मित्रमंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

दरम्यान, कुंभार कुटुंबावर आलेले संकट मोठे असल्याने इतर सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती तसेच प्रशासनानेही पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन तळवडे बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संकटसमयी माणुसकीचा हात पुढे करण्याच्या या उपक्रमामुळे तळवडे बाजारपेठेतील सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले आहे.