ॲड. अनिल निरवडेकर यांचा ‘विकासाचा एल्गार’; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कट्टर समर्थकांची प्रभाग १० मधून ‘धडाक्यात’ राजकीय एन्ट्री
सावंतवाडी, ता. १७ नोव्हेंबर:
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग १० मधून एक दमदार उमेदवार रिंगणात उतरवत जोरदार आव्हान उभे केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आणि ज्येष्ठ वकील ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज धडाक्यात दाखल केला आहे.
उच्चशिक्षित आणि व्यवसायाने वकील असलेल्या निरवडेकर यांचा दांडगा असलेला लोकसंपर्क पाहता, भाजपने विरोधी उमेदवारांसाठी या प्रभागात एक मोठे आव्हान उभे केले आहे.
‘खुर्चीसाठी नाही, विकासासाठीची लढाई’
विकासाचे एकमेव ‘अस्त्र’ घेऊन ॲड. निरवडेकर सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपले ठाम मत व्यक्त केले. ते म्हणाले, “ही निवडणूक केवळ खुर्चीसाठी नाही, तर प्रभागाच्या प्रलंबित विकासासाठीची निर्णायक लढाई आहे.”
पक्षश्रेष्ठींचा ‘विश्वास’ जिंकलेले निरवडेकर आता थेट मतदारांच्या न्यायालयात उतरले आहेत. निरवडेकर यांच्या या एन्ट्रीमुळे प्रभाग १० मधील सत्ता समीकरणांना हादरा देण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे, हे स्पष्ट झाले आहे. ॲड. निरवडेकर यांचा हा ‘विकासाचा एल्गार’ विरोधी पक्षाचे पत्ते कसे उधळतो, याकडे आता संपूर्ण सावंतवाडीचे लक्ष लागले आहे.
यावेळी युवराज लखमराजे भोसले, सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक अन्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







