ठळक घडामोडी

नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून सदिच्छा भेट; सावंतवाडीतील ट्रॅफिक समस्येवर उद्या महत्त्वपूर्ण बैठक

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती झाल्यानंतर सावंतवाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान सावंतवाडी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) सकाळी १२ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीवर तात्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

बैठकीस पोलीस निरीक्षक व ट्रॅफिक पोलीस विभागाचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी, स्थानिक वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, ऑटो रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे मुख्याधिकारी, सर्व सभापती तसेच नगरसेवक उपस्थित राहणार असून, सर्व संबंधित यंत्रणांना एकाच मंचावर आणून शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, आरोग्य सभापती सुधीर अडीवरेकर तसेच पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर उपस्थित होते.