ठळक घडामोडी

विधानसभा निवडणुकीनंतर दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज स्वगृही परतले

मुंबई

विधानसभा निवडणुकीनंतर दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सोमवारी मुंबई येथे सेना भवनात स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधण्यासाठी निमंत्रित करून बाळा गावडे यांना सक्रिय केले.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रभावी संघटनात्मक काम करत असताना बाळा गावडे यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला होता. जुन्या नव्या शिवसैनिकांची मोट बांधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नव्याने शिवसेना संघटना बांधली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उबा ठाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बाळा गावडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात असताना, दीपक केसरकर यांच्या विरोधात कडवे रणशिंग फुंकणाऱ्या माजी आमदार राजन तेली यांना आयत्यावेळी उमेदवारी दिली गेली. त्यामुळे बाळा गावडे यांनी तेली यांच्या पराभवासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता शिंदे गटात दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते सक्रिय होण्यासाठी बाळा गावडे यांच्या संपर्कात होते.
दरम्यान, सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळा गावडे यांना संवाद साधण्यासाठी निमंत्रित करून पक्षात सक्रिय करून घेतले.