
शाहूवाडी (कोल्हापूर):
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले विशाळगड येथे भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सकल हिंदू समाज, शाहूवाडी यांच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री. श्री. नितेशजी राणे साहेब यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
वैदिक मंत्रोच्चारात शिवरायांना जलाभिषेक
विशाळगडाच्या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. गडकिल्ल्यांच्या पवित्र जलाने आणि दुग्धाभिषेकाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो शिवभक्तांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्याने विशाळगडचा आसमंत दणाणून गेला. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे प्रत्येक शिवभक्ताच्या मनात अभिमान, श्रद्धा आणि स्वराज्याप्रती निष्ठेची भावना पुन्हा एकदा दाटून आली.
स्वराज्य हा केवळ कारभार नसून स्वाभिमानाचा लढा: नितेश राणे मत्स्यव्यवसाय मंत्री
याप्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते, तर ते स्वाभिमान, न्याय, धर्मरक्षण आणि रयतेच्या कल्याणासाठी उभारलेले पवित्र ध्येय होते. आज आपण सर्वजण त्या तेजस्वी आणि पराक्रमी परंपरेचे वारसदार आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, छत्रपतींचे विचार, त्यांचा अलौकिक त्याग आणि त्यांचे राष्ट्रकार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत आणि प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणे, हेच त्यांना खरी मानवंदना ठरेल. “जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात,” असे सांगत त्यांनी शिवभक्तांमध्ये नवा उत्साह वाढला.या सोहळ्यासाठी शाहूवाडी तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त, तरुण आणि महिला विशाळगडावर दाखल झाल्या होत्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे झेंडे आणि शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी या सोहळ्याची भव्यता अधिकच वाढवली. सकल हिंदू समाज, शाहूवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.







