गोवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक जैविक बुद्धिवंत. जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी झटतो, असे व्यक्तिमत्व होते. बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंड, ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. जुलमी व अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध उद्गारलेली वज्रमूठ म्हणजे बाबासाहेब होत. जातीयता विरुद्ध आणि विषमतेविरुद्ध प्रहार करण्याचे चक्र म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. खऱ्या अर्थाने विचारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे ते युगपुरुष आहेत. आधुनिक भारताचे ते राष्ट्रनिर्माते आहेत, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी वेरणा (गोवा) येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या ‘संयुक्त जयंती’ कार्यक्रमात व्यक्त केले.
वेरणा येथील कोकण रेल्वेच्या अखिल भारतीय एस.सी., एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डीईई शुभम सिन्हा, वरिष्ठ डीओएम इनायत हुसेन, सुप्रसिद्ध शिल्पकार तथा उपक्रमशील शिक्षक हंसराज गवळे, संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव दीपक जाधव, सुरज कांबळे आदि उपस्थित होते.
दरम्यान आपल्या व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही नम्रता, स्वाभिमान व प्रामाणिकता यांचा त्रिवेणी संगम आहेत. ते एक शोषिक, सर्जनशील समाजक्रांतीकारक असून त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह, अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रह करून अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळवून दिला. समानतेच्या हक्काचा लढा त्यांनी दिला. तसेच बाबासाहेब यांनी मन्वंतर घडविणारी पत्रकारिता केली. बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता अशा त्यांच्या मुखपत्रांतून शोषित व पिढीतांचे प्रश्न त्यांनी मांडले. त्यांनी कर्मचारी बांधवांसाठी कायदामंत्री असताना खऱ्या अर्थाने कामाचे स्वरूप व वेतनाचे स्वरूप निश्चित केले आहे. काही धर्म मार्तंडांनी अनेक पिढ्या बहिष्कृत केलेल्या समाजाला त्यांनी माणूस म्हणून जगण्यासाठी संविधानाद्वारा न्याय मिळवून दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच संयुक्त जयंती समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे वृक्षाचे रोप, गुलाबपुष्प व बाबासाहेबांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित डीईई शुभम सिन्हा, इनायत हुसेन, हंसराज गवळे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान कार्यक्रमात शिल्पकला, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे उपक्रमशील शिक्षक हंसराज गवळे यांचा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले.







