सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव
सम्राट क्लबच्या उपक्रमांना नगर परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची ग्वाही
सावंतवाडी | प्रतिनिधी
“सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी असून या नगरीला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. ‘सम्राट इंटरनॅशनल क्लब’च्या माध्यमातून संगीत, संस्कृती आणि कला जपण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. भविष्यात अशा सांस्कृतिक उपक्रमांसाठी सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली.
सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहात आयोजित विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. गोवा-मये येथील सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या अंतर्गत नव्याने स्थापन होत असलेल्या ‘सम्राट क्लब सावंतवाडी शहर’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मालवणी कवी दादा मडकईकर, मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर, सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, अर्जुन नाईक, आगामी सम्राट क्लब सावंतवाडी शहराचे पदाधिकारी नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, ॲड. सौ. सिद्धी परब, सौ. स्मिता केंकरे, पत्रकार तथा प्रा. रूपेश पाटील, सज्जन बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ‘सम्राट संगीत सितारा २०२६’चा मानकरी हर्ष नकाशे याच्यासह शास्त्रीय संगीत स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सिंधुदुर्गातील गुणवंत कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये कु. पल्लवी पिळणकर (माणगाव, ता. कुडाळ), साहिल देसाई (मणेरी, ता. दोडामार्ग) तसेच गतवर्षीची ‘संगीत सितारा’ विजेती श्रुती सावंत यांचा गौरव उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी सम्राट क्लबच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, यंदाच्या संगीत स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी ‘संगीत सितारा’चा मान जिल्ह्याला मिळवून दिला. ही संपूर्ण सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन अर्जुन नाईक यांनी केले, सूत्रसंचालन आशुतोष चिटणीस यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील राऊळ यांनी मानले. या प्रसंगी सावंतवाडी परिसरातील संगीतप्रेमी, रसिक नागरिक, कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







