सावंतवाडी
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी (७५वा) वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब म्हणाले की, राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅ. नाथ पै सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच रुग्णांना फळवाटप, गरजूंना धान्य वाटप, वृक्ष वाटप तसेच अनाथाश्रमांना मदत अशा सामाजिक उपक्रमांचाही समावेश आहे.
दरम्यान,महिला आघाडीच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले की, लहान मुले व महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय पत्रकार भगिनींचा सन्मान, महिला कीर्तनकारांचा गौरव तसेच विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पाककला स्पर्धेसह अनेक उपक्रमांद्वारे हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.







