कुडाळ येथे भव्य सत्कार; संवाद मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
कुडाळ :
सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगारातील कर्मचारी भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ येथील वेताळ-बांबर्डे तेली समाज हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने एसटी कर्मचारी संवाद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगारांमधील चालक, वाहक, यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, उपाध्यक्ष बाळू देसाई, कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, केंद्रीय कार्यकारिणी कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे, पुणे प्रदेशाध्यक्ष अमोलजी तांबेकर, कोल्हापूर मीडिया प्रमुख कमलाकर अत्राम, आजरा आगार सहसचिव रोहित गबाले, भाजपा कामगार मोर्चा संयोजक तथा संघटनेचे सल्लागार अशोक राणे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, माजी जि. प. सदस्य भारती चव्हाण, भाजपा कार्यकर्ते शैलेश जामदार आदी उपस्थित होते. भरत चव्हाण यांच्या पत्नी, आई-वडील व मुलेही या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गोट्या सावंत म्हणाले की, “आपण माणसं आहोत. शंभर टक्के आपणच बरोबर आहोत असे म्हणता येणार नाही. कुठे ना कुठे कमतरता राहणारच आहे. मात्र, जेवढे शक्य आहे तेवढे कामगारांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि यापूर्वीही आम्ही काम केले आहे.” सध्या राज्यात आणि देशात आपली सत्ता असल्याने संघटनेने मांडलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे व चांगले काम करावे. जिथे कर्मचाऱ्यांना त्रास होईल, तिथे संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असेही सावंत यांनी सांगितले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे हे संघटनेच्या पाठीशी नेहमीच उभे राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भरत चव्हाण यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झालेली निवड कोणत्याही शिफारशीमुळे झालेली नसून, गेल्या काही वर्षांत त्यांनी संघटना वाढीसाठी केलेल्या योगदानाचे हे फळ आहे, असे गोट्या सावंत यांनी सांगितले. भरत चव्हाण यांना केंद्रीय कार्यकारिणीवर संधी दिल्याबद्दल संघटनेचे संस्थापक व आमदार गोपीचंद पडळकर यांचे त्यांनी आभार मानले.
‘लालपरी, जिजाऊ’ बसेसमुळे चालक-वाहकांना दिलासा
सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी एसटीच्या जुन्या बसेसच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. महायुती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विभागाला ‘लालपरी’ आणि ‘जिजाऊ’ बसेस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने चालक-वाहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र, सीएनजी बसेसमुळे अनेक वेळा एसटीचे वेळापत्रक कोलमडत असल्याची समस्या त्यांनी मांडली. या प्रश्नावर केंद्रीय कार्यकारिणीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई आणि संघटनेचे सल्लागार अशोक राणे यांनीही मार्गदर्शन केले.
केंद्रीय कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे यांनी प्रास्ताविकातून संघटनेची आजपर्यंतची वाटचाल, संघटनेची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
‘सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे संघटना वाढवता आली’
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
“जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी साथ दिली. त्यामुळेच मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संघटना वाढवता आली. सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांसाठी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे जाणवत होते. त्यात सुधारणा व्हावी, ही माझी भूमिका होती,” असे चव्हाण म्हणाले.
एसटीचे निवृत्त कर्मचारी आणि संघटनेचे सल्लागार अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात यश आले. जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये संघटनेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्याची प्रचिती येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ आगारातील प्रशांत गावडे व दिनेश शिरवलकर यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.
या संवाद मेळाव्यास विभागीय कार्यकारी सदस्य स्वप्निल रजपूत, महादेव भगत, प्रशांत गावडे, मनोजकुमार पवार, शैलेंद्र परब, बाबली तुळसकर, विभागीय कार्यशाळेचे अविनाश रणसिंग, अरुण पिळणकर, देवगड आगाराचे अध्यक्ष प्रथमेश घाडी, सचिव साई ओटवकर, विभागीय कार्यालय अध्यक्ष पप्या गावडे, सचिव पंकज कासार, कणकवली सचिव वैभव घोणे, विजयदुर्ग अध्यक्ष पप्प्या मिठबावकर, सचिव रोहन शिंदे, सावंतवाडी अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सचिव आबा माणगावकर, वेंगुर्ला सचिव दाजी तळवणेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध आगारांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







