ठळक घडामोडी

स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या; पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

सावंतवाडी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार तसेच सकल मराठा व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचे सुपुत्र समर्थ सिताराम गावडे यांच्या दुःखद निधनानंतर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गुरुवारी (दि. १६) त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी पालकमंत्री राणे यांनी गावडे कुटुंबीयांना धीर देत, “मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी कधीही भरून न निघणारे असते. मात्र, या कठीण प्रसंगी धीर धरा. स्वतःला सावरून कुटुंबाची काळजी घ्या,” अशा शब्दांत त्यांचे सांत्वन केले.

समर्थ गावडे यांचे बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले होते. ही बातमी समजताच पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गावडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, रवि मडगांवकर, गजानन गावडे, विद्याधर परब, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, अमित गवंडळकर, बंटी पुरोहित तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.