
‘क्रोकोडाईल मॅन’च्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम! सोनुर्लीत ४ फुटी मगर जेरबंद; ग्रामस्थांचा मोठा धोका टळला.
सोनुर्ली, सावंतवाडी:
सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मगरींचे वाढलेले प्रमाण पाहता, ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणात सोनुर्ली गावासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोनुर्ली-पाटये कुंभेवाडी येथील शेतकरी नंदू तारी यांच्या शेततळ्यामध्ये सुमारे चार फूट लांबीची मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, वनविभागाने तातडीने सूत्रे हलवत या मगरीला सुरक्षितपणे पकडले.
वनखात्याचे कर्मचारी आणि सावंतवाडी येथील जलद कृती दल (RRT) टीमने ही मोहीम अत्यंत कुशलतेने पार पाडली. विशेष म्हणजे, ‘क्रोकोडाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अनुभवी टीम प्रमुख बबन रेडकर यांनी आपल्या स्टाफसह या बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याचा मार्ग मोकळा केला.
सध्या सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मगरींचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ धास्तावले आहेत. विशेषतः शेततळ्यांमध्ये आणि पाण्याच्या स्रोताजवळ मगर आढळून येत असल्याने शेतीच्या कामावर परिणाम होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत, बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कौशल्यामुळे सोनुर्ली येथील ग्रामस्थांचा मोठा धोका टळला आहे.
या यशस्वी कामगिरीमुळे वनविभाग आणि जलद कृती दलाच्या टीमचे परिसरातून कौतुक होत आहे, तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने या भागात अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसापूर्वी वेत्ये गावात पण एक भली मोठी मगर पकडली होती त्यावेळी पण हे मगर वन खात्याचे कर्मचारी व सदर पथकाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले होते..







