ठळक घडामोडी

तळवडेतील श्री जनता विद्यालयात ‘युवक आर्थिक साक्षरता’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात!!आरबीआय, जिल्हा अग्रणी बँक व धान फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन व सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन

सावंतवाडी | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील युवकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी, बचतीची सवय लागावी आणि डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने आर्थिक साक्षरता केंद्र, मालवण यांच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), जिल्हा अग्रणी बँक (Bank of India) आणि धान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै रोजी तळवडे येथील श्री जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘युवक आर्थिक साक्षरता जनजागृती’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक (LDM) श्री. ऋषिकेश गावडे यांनी केले. त्यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करत बचत, गुंतवणूक, आर्थिक नियोजन तसेच विविध शासकीय विमा योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या LDO मिस. बेनाझीर शेख यांनी डिजिटल फ्रॉड, ग्राहक संरक्षण आणि सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन केले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ओटीपी, पिन, लॉटरी व बक्षीस फसवणूक, व्हॉट्सॲपवरील अनोळखी एपीके (APK) फाईल्स, संशयास्पद लिंक्स तसेच AnyDesk व TeamViewer सारख्या स्क्रीन शेअरिंग ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
“बँक कधीही फोनवर ओटीपी किंवा पिन विचारत नाही. पैसे प्राप्त करण्यासाठी यूपीआय (UPI) पिनची आवश्यकता नसते. तसेच पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून दूर राहावे,” असा महत्त्वपूर्ण संदेश देत सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
धान फाउंडेशनचे केंद्र समन्वयक श्री. सहदेव परब यांनी अंदाजपत्रक, कर्ज व परतफेड, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) यांची माहिती दिली. तसेच एफडी, आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एसआयपी (SIP) यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेचे व्यवस्थापक श्री. विनय कुमार, सावंतवाडी तालुका असोसिएट श्रीमती श्रुती रेडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देसाई, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमातील मार्गदर्शन युवकांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार भविष्यासाठी उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. देसाई यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.