ठळक घडामोडी

सावंतवाडी मतदारसंघातील 33 केव्ही वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने सर्वेक्षणाचे आदेश-विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर वयांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाली बैठक!

मुंबई, दि. ८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह मतदारसंघातील 33 केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या विनंतीनुसार मुंबईतील एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, निर्मल भवन येथे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर यांच्यासह महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंता तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर मोठ्या प्रमाणात जंगल व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे तसेच फांद्या विद्युत तारांवर पडल्यामुळे वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याचे प्रकार वारंवार घडतात. परिणामी वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत आग्रहीपणे मांडली. भूमिगत वीजवाहिन्यांमुळे झाडांमुळे होणारे नुकसान कमी होण्याबरोबरच विद्युत वाहिन्या तुटणे व वीज खांब पडण्याचे प्रकारही कमी होतील. त्यामुळे वीजपुरवठा अधिक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही तातडीच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी आवश्यक निर्देश दिले.

सावंतवाडी मतदारसंघातील 33 केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत.