ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट; कायदा-सुव्यवस्था व वाहतूक नियंत्रणावर सकारात्मक चर्चा

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेला विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संपादक श्री. शेखर सामंत तसेच ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.

या प्रसंगी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोंसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सदिच्छा भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, विविध सभापती व नगरसेवक यांच्यात शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांची सुरक्षा या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नगरपालिका प्रशासन व पोलीस विभाग यांच्यात अधिक चांगला समन्वय राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर तसेच नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सुकन्या टोपले, देवेंद्र टेमकर, सिद्धार्थ भांबुरे, स्नेहा नाईक यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.