
सावंतवाडी, ता. १५ : शिवसेना नेते तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केअरलाईफ हॉस्पिटल, बेळगाव यांच्या सहकार्याने शिवसेना सावंतवाडी आणि दीपक केसरकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून, तब्बल २१ विविध आजारांवरील मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी असून, त्यानिमित्त सावंतवाडी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी संजू परब यांनी सांगितले की, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर २० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर भरविण्यात येणार असून, विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येतील. नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेविका सायली दुभाषी, देव्या सूर्यवंशी, नीता कविटकर, उपजिल्हाप्रमुख सुधा कवठणकर, शहराध्यक्ष भारती मोरे आदी उपस्थित होते. तसेच महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी नगरसेवक देव्या सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.







