ठळक घडामोडी

ओंकार’ हत्तीचा महामार्गावर ठिय्या, वाहतुकीचा खोळंबा; वनविभागाची दमछाक

सावंतवाडी/इन्सुली (सिंधुदुर्ग) –

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे शनिवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या ‘ओंकार’ नावाच्या जंगली हत्तीने रात्रभर दोन्ही महामार्गाच्या मध्यभागी ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे सहा वाजल्यापासून हा हत्ती महामार्ग ओलांडून तेरेखोल नदीपात्राच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता.
महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ आणि हत्तीला पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांची गर्दी यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्तीला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवताना वनविभागाची अक्षरशः दमछाक झाली.
अखेरीस, सकाळी साडेआठच्या सुमारास ओंकार हत्तीने महामार्ग ओलांडला आणि तो तेरेखोल नदीपात्रालगतच्या बागायतीत गेला. हत्ती महामार्ग ओलांडत असताना दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांना बराच काळ थांबावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालत असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ धास्तावले आहेत. वनविभाग हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, तो पुन्हा लोकवस्तीत किंवा महामार्गावर येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.