ठळक घडामोडी

कर्तृत्वाचा महामेरू: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गजांच्या उपस्थितीत ‘लोकनेत्या’चा गौरव

सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर
“महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून शाबासकी दिली, ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत,” अशा भावूक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा पार पडला. यावेळी राणे साहेबांच्या जीवनावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बजेटची ‘चिरफाड’ करणारे अर्थतज्ज्ञ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राणे यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या ‘बजेट कसं वाचावं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते.” राणे यांच्या शिस्तीचे आणि दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेज आणि गोशाळेचा गौरव केला.

संकटावर मात करणारा जिद्दी नेता: नितीन गडकरी (केंद्रिय मंत्री)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राणे यांच्या संघर्षाचे कौतुक केले. “राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले, तरी राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही. उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली. एक प्रभावी आणि आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोकणच्या विकासाचे शिल्पकार

या सोहळ्यात उपस्थित अन्य मान्यवरांनीही राणे यांच्या योगदानावर प्रकाश टाकला:

  • . उदय सामंत(मंत्री)-“कोकणी जनतेने राणे साहेबांना कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचा मान दिला आहे. त्यांच्या धाकातही माया आणि मार्गदर्शनात आपुलकी आहे.”
  • सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-“वरवडे ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा जिद्दीचा आदर्श नमुना आहे. त्यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख मिळाली.”
  • रविंद्र चव्हाण: भाजप प्रदेशाध्यक्ष-“कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आणि त्यांना आत्मविश्वासाने उभे करण्याचे कार्य राणे साहेबांनी सातत्याने केले.”

तर यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल: नारायण राणे

सत्काराला उत्तर देताना खासदार नारायण राणे भावूक झाले. ते म्हणाले, “आयुष्य हे केवळ यश-अपयशाचा प्रवास नसून प्रामाणिक प्रयत्नांची अखंड साधना आहे. मी जे काही मिळवलं, ते माझ्या जिद्दीवर आणि परिश्रमांवर! छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श माझ्या आयुष्याचा आधार राहिला आहे. संकटं आली, पण मी कधीही हार मानली नाही.” माणुसकीला सर्वोच्च स्थान देऊन जनतेची सेवा करत राहण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.


दिग्गजांची उपस्थिती:


या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, निलेश राणे आणि यजमान आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. खासदार नारायण राणे यांचा ७५वा वाढदिवस थाटात संपन्न झाला.


हा सोहळा केवळ एका नेत्याचा सत्कार नव्हता, तर कोकणच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी झटणाऱ्या एका ‘तुफानाचा’ गौरव होता.