ठळक घडामोडी

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८७ च्या बॅचचा आदर्श; स्वतःच्या निधीतून गावाला दिली ‘शव शीतपेटी’!जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव; ‘शुभांगी क्लिनिक’कडे सोपवली पेटीची व्यवस्था

तळवडे (प्रतिनिधी):
सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील गरज ओळखून या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या निधीतून परिसरासाठी एक ‘शव शीतपेटी’ (Freezer Box) उपलब्ध करून दिली आहे. या लोकहितोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा रविवार, २८ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८७ च्या विद्यार्थ्यांनी समाजाची गरज ओळखून, सामाजिक बांधिलकी राखत स्वतःच्या निधीतून शव शीतपेटी गावाला देऊन एक मोलाचे काम केले आहे. ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे.”*

ग्रामीण भागात मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा अशा शव शीतपेटीची तातडीने गरज भासते. हीच अडचण ओळखून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या सोहळ्याला उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाला सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, सावंतवाडी कंजूमर सोसायटी अध्यक्ष प्रमोद गावडे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक (मुंबई) पुरुषोत्तम देसाई, पेडुर गावचे सरपंच संतोष गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी उपस्थित होते.
तसेच डॉ. भक्ती कांडरकर, तळवडे पोलीस पाटीलश्री जाधव,, तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब,तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी अध्यक्ष विलास परब,,श्री जनता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका विद्युला पाटकर, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर,सिद्धेश्वर ग्राम उत्कर्ष मंडळ अध्यक्ष रवींद्र सावंत, रवींद्र परब, डॉ. भालचंद्र कांडरकर, प्रकाश नारायण परब, विलास नाईक जिल्हा बँक कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याचे औचित्य साधून परिसरातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रसाद गावडे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिक्षक विकास नाईक यांनी मानले.

‘शुभांगी क्लिनिक’कडे जबाबदारी;

या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली शव शीतपेटी गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावी, यासाठी तिची पुढील व्यवस्था ‘शुभांगी क्लिनिक, डॉ. कांडरकर, तळवडे’ (ता. सावंतवाडी) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

तळवडे व परिसरातील ज्या गरजू नागरिकांना या शव शीतपेटीची सेवा हवी असेल, त्यांनी मोबाईल क्र. ९०१११६१६२३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन १० वी १९८७ बॅचच्या निमंत्रकांनी केले आहे.

एक सामाजिक आणि सेवाभावी कार्य म्हणून आम्ही ही शव शीतपेटी तळवडे व परिसरातील जनतेसाठी समर्पित करत आहोत, अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या उद्घाटन प्रसंगी तळवडे परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.