
माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी ‘हायटेक’ प्रचार
पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा दिला विश्वास
सावंतवाडी प्रतिनिधी |
माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली आहे. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महिला सक्षमीकरण आणि उत्तरदायी व्यवस्थापनावर भर
सौ. कोरगावकर यांनी आपल्या भाषणातून सावंतवाडीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याच्या तिन्ही टप्प्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक कार्यातून नागरिकांच्या अपेक्षा, अडचणी आणि आशा समजून घेतल्या असून, या अनुभवातून सुजाण, जबाबदार आणि लोकअभिमुख नगरपरिषद उभी करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.
त्यांच्या विकासाच्या अजेंड्यावर महिलांचे सक्षमीकरण, उत्कृष्ट पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणपूरक नियोजन आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणारे उत्तरदायी स्थानिक स्वराज्य व्यवस्थापन याला सर्वोच्च प्राधान्य असेल. “आपल्या कार्यकाळात ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्यापुढे आणखी काटेकोरपणे आणि निष्ठेने त्या निभावण्याची तयारी मी दाखवते,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जनतेच्या सहकार्याचे आवाहन
धनशक्तीपेक्षा जनतेचे सहकार्यपूर्ण प्रतिसाद आणि विधायक सूचना आपल्यासाठी अधिक महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘जनतेने मला साथ द्यावी’ असे कळकळीचे आवाहन करत नगराध्यक्षपदासाठी त्यांनी जोरदार प्रचार करत आघाडी घेतली आहे. त्यांनी केवळ शहर पिंजून काढत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला नाही, तर प्रतिस्पर्धकांना तोडीस तोड देण्यासाठी डिजिटल आणि हायटेक प्रचाराचा प्रभावी वापर केल्याचे दिसून येत आहे.
सौ. कोरगांवकर यांचा प्रचार प्रभावी; विकास आणि रोजगारावर लक्ष केंद्रित!
सौ. कोरगांवकर यांनी आपल्या प्रचार मोहिमेत पक्ष्यांच्या तोडीस तोड असा डिजिटल आणि हायटेक प्रचार प्रभावीपणे केला आहे.
यावेळी बोलताना सौ. कोरगांवकर यांनी आपले मुख्य लक्ष विकास आणि रोजगार यावर असेल, असे स्पष्ट केले. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे जनता आपल्याला निश्चितच विजयी करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रचारप्रसंगी ऐश्वर्या कोरगांवकर, अखिलेश कोरगांवकर, व्यंकटेश शेट आदींसह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






