मळगाव, दि. ३०:
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशीत उद्या रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात सायंकाळी ठीक ४:०० वाजता हे संमेलन पार पडणार आहे.
प्रमुख वक्ते आणि अतिथींची लाभणार उपस्थिती
या संमेलनासाठी मार्गदर्शक आणि प्रमुख वक्ते म्हणून ‘सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार गणेशराव ठाकरे (एम.डी., एलएल.बी., एम.बी.ए., पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकोलीगल स्टडीज) उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदायाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री लक्ष्मण दत्ताराम कडव महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन निवृत्त राजपत्रित अधिकारी ह.भ.प. श्री शेखर मधुकर पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
पारंपरिक वेषात उपस्थित राहण्याचे आवाहन
‘हिंदू संमेलन समन्वय समिती, मळगाव पंचक्रोशी’ यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “एकत्र येऊ, जागृत होऊ, आणि धर्मसंरक्षणासाठी कटिबद्ध होऊ! हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवू…” असा संदेश या संमेलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
मळगाव पंचक्रोशीतील तसेच परिसरातील सर्व माता, बंधू आणि भगिनींनी आपल्या मित्र परिवारासह आणि सहकुटुंब पारंपरिक मंगल वेषात या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन हिंदू संमेलन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.







