ठळक घडामोडी

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ-मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा

मुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने ‘वर्सोवा ते कोकण’ या मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या विशेष बससेवेला सुरुवात करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरत आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सण असून, बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक कोकणकर आतुरतेने आपल्या गावाची वाट धरत असतो. अशा परिस्थितीत मोफत लक्झरी बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या बससेवेमुळे प्रवासाचा खर्च कमी होण्यासोबतच गणेशभक्तांना आरामदायी आणि नियोजित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या कोकणवासीयांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या शुभारंभप्रसंगी स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय नागरिक उपस्थित होते. उपस्थित गणेशभक्तांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले