ठळक घडामोडी

तिलारीच्या पाण्याने वेंगुर्ला-चिपीचा पाण्याचा प्रश्न सुटणार! नाबार्डअंतर्गत 15 दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश; आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक मळगाव, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली, न्हावेलीसह सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा योजनेत समावेश

मुंबई, दि. ८ऑगस्ट :

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या टप्पा-१ या महत्त्वाकांक्षी योजनांना गती देण्यासाठी महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या दोन्ही योजना नाबार्डअंतर्गत प्रस्तावित करून त्यांना मंजुरी मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर यांच्यासह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, नाबार्डचे अधिकारी तसेच सिंधुदुर्गातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या योजनांचे प्रस्ताव नाबार्डअंतर्गत मंजुरीसाठी पुढे नेण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

सावंतवाडीतील गावांसह रेल्वे स्टेशनलाही पाणी

बैठकीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली आणि न्हावेली या गावांना तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या गावांचा व सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा समावेश वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजनेत करण्याचे निर्देश देण्यात आले.

या सर्व बाबींचा समावेश करून १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पर्यटन, उद्योग आणि चिपी विमानतळाला मिळणार मोठी चालना

तिलारी प्रकल्पावर आधारित या पाणीपुरवठा योजनेमुळे वेंगुर्ला-चिपी परिसरातील उद्योगधंदे, हॉटेल व्यवसाय, पर्यटन व्यवसाय तसेच स्थानिक व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा पाणीपुरवठ्यामुळे या भागातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

विशेषतः उन्हाळ्यात मार्च ते मे या कालावधीत किनारपट्टी भागातील अनेक गावांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या योजनेमुळे या गावांची पाण्याची गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

तसेच भविष्यात चिपी विमानतळाच्या विस्ताराच्या दृष्टीनेही या पाणीपुरवठा योजनेचा मोठा फायदा होणार असून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तिलारीच्या पाण्याचा प्रभावी वापर करून सिंधुदुर्गातील पाणीटंचाई, पर्यटन आणि विकासाला चालना देणाऱ्या या योजनांना आता शासनस्तरावरून वेग मिळाल्याने वेंगुर्ला-चिपी-सावंतवाडी परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.