ठळक घडामोडी

भारत माता की जय’च्या जयघोषाने सावंतवाडी दुमदुमली!

भाजपाच्या पुढाकाराने भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग

सावंतवाडी, ता. १० : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावंतवाडी शहरात भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पुढाकाराने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आयोजित या यात्रेला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’**च्या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी शहर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या तिरंगा यात्रेमुळे वातावरणात राष्ट्रभक्तीची लहर निर्माण झाली.

या तिरंगा यात्रेचे आयोजन भाजप युवा नेते विशाल परब, अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते यात्रेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

या यात्रेत शिवसेनेचे नेते तथा आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोंसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

‘तिरंगा हा देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक’ -आमदार दिपक केसरकर

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार दिपक केसरकर म्हणाले, “तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून तो देशाचा स्वाभिमान, त्याग, शौर्य आणि एकतेचे जिवंत प्रतीक आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानात हिरिरीने सहभाग घ्यावा.”यावेळे भाजप युवा नेते विशाल परब , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

तिरंगा यात्रेदरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वज हातात घेत सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडीकरांच्या देशप्रेमाची आणि राष्ट्रध्वजाप्रती असलेल्या अभिमानाची प्रचिती देणारा ठरला.