नगराध्यक्षपदाचे उमेदवार सक्षम – पालकमंत्री नितेश राणेंचे विरोधकांवर टीकास्त्र
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात भाजप (BJP) आता चारही प्रमुख नगरपालिकांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला या चारही नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष विराजमान होणार असून, पक्षाचे उमेदवार अत्यंत सक्षम आहेत, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.सावंतवाडी राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले, तसेच भाजपच्या विकासाभिमुख भूमिकेवर जोर दिला.
‘विकासावर लक्ष केंद्रित’
“आम्ही केवळ विकासावर बोलत आहोत, मात्र विरोधक मुद्दामहून वातावरण खराब करत आहेत. आम्ही टीकाटिप्पणीमध्ये न पडता केवळ विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. मतदार हाच आमचा केंद्र बिंदू आहे. मतदारांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे,” असे पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.श्रद्धाराजे भोसले या राजघराण्यातील सूनबाई आहेत त्याच सावंतवाडीच्या नगराध्यक्ष होणारं आहेत. आणि त्या सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाला सहकार्य करणार आहेत,” असे राणे यांनी नमूद केले
नारायण राणे यांना संपवण्याचा कट उधळला!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य करत असलेल्या विरोधकांवर नितेश राणे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “राणे साहेब यांचे खच्चिकरण करण्याचें काम 2014 पासून 2024 पर्यंत सुरु आहे. हे सर्वप्रथम कोणी सुरु केले ते केसरकर यांनीच स्वतःच सागवे मात्र, भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना खासदार बनवले, केंद्रीय मंत्री बनवले. भाजपने माझ्या पाठीशी राहून मला आमदार आणि मंत्री बनवले. त्यामुळे आम्हाला कोणीही संपवू शकत नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.
केसरकरांवर आरोग्य व्यवस्थेवरून थेट हल्ला
दीपक केसरकर यांच्यावर थेट हल्ला चढवताना नितेश राणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. “भाजपचे हक्काचे नगराध्यक्षपद मागत असलेल्या केसरकर यांनी सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांतील आरोग्य व्यवस्था का सुधारली नाही?,” असा थेट सवाल त्यांनी केसरकरांना केला.
‘निलेश राणे यांना जाणीवपूर्वक एकटे पाडले जात आहे’
यावेळी आमदार निलेश राणे यांच्या बाजूने शिवसेनेचा कोणताही नेता बोलत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आमदार निलेश राणे यांच्या बाजूने शिवसेनेचा कोणीही नेता बोलत नाही, त्यांना जाणीवपूर्वक एकटे पाडले जात आहे,” असे म्हणत पालकमंत्री नितेश राणे यांनी आपला संताप व्यक्त केला.
. या पत्रकार परिषदेला युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सुधीर आडीवरेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.







