ठळक घडामोडी

होडावडे-तळवडेत तीन अजगरांचा थरार; सर्पमित्र महेश राऊळ यांची तत्पर कामगिरी

होडावडे-तळवडेत तीन अजगरांचा थरार; सर्पमित्र महेश राऊळ यांची तत्पर कामगिरी

होडावडे : होडावडे गावात गेल्या दोन दिवसांत दोन भलेमोठे अजगर, तर तळवडे गावात एक अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तिन्ही घटनांची माहिती मिळताच तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अजगरांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

होडावडे येथील दीपक दळवी (धोंडदळवीवाडी) यांच्या घराशेजारील शेतमागरात एक अजगर आढळून आला. या अजगराने दोन कोंबड्या फस्त केल्यानंतर तो कोंबडीच्या पिंजऱ्यात शिरला होता. माहिती मिळताच सर्पमित्र महेश राऊळ यांनी घटनास्थळी पोहोचून अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडले.

त्यानंतर होडावडे येथील सौ. देवकी नाईक यांच्या घराच्या मागील पडवीत, नाईकवाडी परिसरात आणखी एक अजगर आढळून आला. सुमारे आठ फूट लांबीच्या या अजगरामुळे परिसरात खळबळ उडाली. महेश राऊळ यांनी या अजगरालाही सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

दरम्यान, तळवडे गावातही एक अजगर आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच महेश राऊळ यांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून अजगराला सुरक्षितपणे पकडले आणि त्यालाही योग्य नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात अजगरांचे दर्शन वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सर्पमित्र महेश राऊळ यांच्या तत्परतेमुळे तिन्ही अजगरांना कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यांच्या या कामाबद्दल ग्रामस्थांनी महेश राऊळ यांचे कौतुक करत आभार मानले.