निरवडे, वार्ताहर : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे दि. १० जुलै २०२६ रोजी शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात पार पडली. शाळेतील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रचार प्रक्रियेनंतर मतदान शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले.
या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे मतदानासाठी मोबाईलद्वारे ईव्हीएम (EVM) प्रणालीचा वापर करण्यात आला. या आधुनिक मतदान पद्धतीचा विद्यार्थ्यांना अनोखा आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
मतदानानंतर तात्काळ मतमोजणी करून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन डॉ. शेखर जैन, मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर, समन्वयक श्री. अजय बांदेकर तसेच शिक्षकवृंद यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, सहकार्याची भावना तसेच लोकशाही प्रक्रियेबद्दल आदर निर्माण झाला. निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.







