:
सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा
सावंतवाडी:
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरात ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भव्य ‘मालवणी करंडक’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्गातील एकूण १२ निवडक एकांकिका सादर होणार असून, यानिमित्ताने खवय्यांसाठी ‘फूड फेस्टिवल’ची मेजवानीही मिळणार आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५ ज्येष्ठ कलाकारांचा होणार ‘कला गौरव’
या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे जिल्ह्यातील ५ ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. यात खालील मान्यवरांचा समावेश आहे:
- सचिन धोपेश्वरकर (सावंतवाडी)
- अंकुश कुंभार (कुडाळ)
- सगुण पोयेकर (मालवण-भरड)
- आनंद नार्वेकर (वेंगुर्ला-वडखोल)
- भास्कर उर्फ भाई सामंत (कणकवली)
महोत्सवाचे वेळापत्रक आणि एकांकिका
हा महोत्सव सावंतवाडी पालिकेच्या मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर पार पडणार आहे. सादरीकरण होणाऱ्या एकांकिका खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक सादरकर्ते आणि एकांकिका
२७ फेब्रुवारी मॅड बॉक्स थिएटर, मुंबई (ठोंब्या)
२८ फेब्रुवारी नाट्यसिंधू, पुणे (चित्रकथी), रंगवलय, अंधेरी (बार-बार), वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली (पडीक), आघाझ द रायझिंग युथ (लपंडाव)
१ मार्च अक्षर सिंधू साहित्य कला मंच, कणकवली (भरकाट), आयडियल इंग्लिश स्कूल, नेरुर (देवराई), प्रथा थिएटर (अमृत्सपुत्र), श्री गोपाळ कृष्ण कला मंच, तळाशील (वाघ्या)
२ मार्च जी.एस. प्रोडक्शन (गाऱ्हाणा), मॅड बॉक्स थिएटर (बोबड्या), अभियांत्रिकी कला मंडळ, रत्नागिरी (तुकारामाची टोपी)
खवय्यांसाठी पर्वणी: चार दिवसीय ‘फूड फेस्टिवल’
महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी चार दिवस फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अस्सल मालवणी पदार्थांपासून ते बिर्याणी, चायनीज, मोमोज आणि पिझ्झा अशा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद पर्यटकांना आणि स्थानिकांना घेता येईल. “सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. हा महोत्सव ‘सावंतवाडी महोत्सवा’ला साजेसा ठरेल, तरी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
— बबन साळगावकर, अध्यक्ष, स्वागत समिती- या पत्रकार परिषदेला महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर , निखिल माळकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.







