ठळक घडामोडी

अथक संघर्षाला यश! सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आता ‘लोकमान्य मधु दंडवते’ यांचे नाव; कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोकणात जल्लोष

सिंधुदुर्ग:
कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे नाव बदलून ते “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
कोकणातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी मान्य झाल्याने मंगळवारी सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

प्रवासी संघटना आणि डिजिटल लढ्याचा विजय

“निर्णय पत्रातून नाही, तर सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून येतो,” हे सावंतवाडीच्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या यशातून सिद्ध केले आहे. या आंदोलनात केवळ पत्रव्यवहार न करता ‘एक्स’ (ट्विटर), फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. हजारो कोकणवासीयांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारला पाठवलेल्या ईमेल्समुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता.
या लढ्यात ‘कोकण विकास समिती’, ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ’ आणि ‘जनजागृती सेवा संस्था’ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि पाठपुरावा

या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेतली.

  • पालकमंत्री नितेश राणे: १८ मे रोजी संघटनेने त्यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरच गोड बातमी देण्याचे आश्वासन दिले होते, जे अवघ्या चार दिवसांत पूर्ण झाले.
  • माजी मंत्री दीपक केसरकर व रवींद्र चव्हाण: यांनी देखील उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले.
    या ऐतिहासिक निर्णयाबद्दल संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांचे आणि खासदारांचे आभार मानले आहेत.

टर्मिनसचा इतिहास आणि रखडलेला विकास

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले होते. पहिल्या टप्प्याचे काम झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले असून सध्या ते संथ गतीने सुरू आहे. प्रा. मधु दंडवते यांच्या नामकरणामुळे आता या रखडलेल्या कामाला गती मिळेल, अशी आशा कोकणवासीयांना आहे.

पुढील लक्ष्य: रखडलेली कामे आणि रेल्वे थांबे

“हा केवळ नामकरण सोहळा नसून कोकणच्या शिल्पकाराचा सन्मान आहे. रेल्वे प्रवासी संघटनेच्या चळवळीमुळेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासाला गती मिळत आहे. आता आमचे पुढील लक्ष्य सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, गाड्यांमध्ये पाणी भरण्याची (Watering Facility) सुविधा उपलब्ध करणे आणि कोरोना काळात रद्द झालेले गाड्यांचे थांबे पूर्ववत करणे हे असेल.”
मिहीर मठकर (सचिव) व सागर तळवडेकर (उपाध्यक्ष), सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना