सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!
सातार्डा | प्रतिनिधी
वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केलेला सातार्डा ते कवठणी हा मुख्य रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा ठरला आहे. अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची खडी उखडल्याने स्थानिक जनतेत संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या आठ दिवसांत हा रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सज्जड इशारा शिवसेना ओबीसी व व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर यांनी दिला आहे.
२.५ कोटींचा निधी गेला कुठे?
कवठणी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंतीसाठी सन २०२२-२३ च्या बजेटमध्ये सुमारे २.५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. हे काम सन २०२४-२५ मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीपासूनच या कामाच्या दर्जाबाबत सुदन कवठणकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी यापूर्वी फोन आणि व्हॉटसअॅपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या सुमार दर्जाबाबत सूचित केले होते. संरक्षक भिंतीला पाईप टाकून केलेले मोरीचे बांधकाम आणि रस्त्याच्या कडेला विखुरलेले बोल्डर्स यामुळे या ठिकाणी अपघाताची टांगती तलवार आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण कामे
सातार्डा ते कवठणी या सुमारे १ कि.मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले खरे, पण निकृष्ट दर्जामुळे ते अल्पकाळातच उखडले गेले.
तसेच, या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे इशारा सुदन कवठणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “सदर संरक्षक भिंतीचे आणि रस्त्याचे काम निकृष्ट आहे. येत्या आठ दिवसात संबंधित ठेकेदाराला सोबत घेऊन ही सर्व कामे पूर्ण न केल्यास, पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. या दरम्यान जर काही अपघात झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”
या इशारा पत्रामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण सातार्डा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









