
आमदार निलेश राणे यांच्याकडून संजू परब यांच्या निष्ठेचा गौरव; सावंतवाडीत वाढदिवसानिमित्त स्नेहमिलन सोहळा
सावंतवाडी:
“राजकारणात डोके लावणारे खूप असतात, पण मन लावून काम करणारे संजू परब यांच्यासारखे कमी असतात. माझ्या राजकीय संघर्षाच्या आणि १० वर्षांच्या कठीण काळात त्यांनी कुठलाही प्रश्न न विचारता सावलीसारखी माझी साथ दिली,” अशा शब्दांत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी परब यांच्या निष्ठेचा आणि समर्पणाचा गौरव केला.
संकटात सावलीसारखा पाठीशी उभा राहणारा भाऊ
संजू परब यांच्याशी असलेल्या स्नेहाचा उलगडा करताना आमदार निलेश राणे म्हणाले, “संजू परब हे केवळ माझे राजकीय सहकारी नसून कुटुंबातील सदस्याप्रमाणे आणि भावासारखे आहेत. गेल्या १६-१७ वर्षांत कोरोनाचा काळ वगळता मी त्यांचा एकही वाढदिवस चुकवलेला नाही. २०१४ ते २०२४ या माझ्या राजकीय संघर्षाच्या काळात मला जिल्ह्यात सक्रिय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. माझ्या राजकीय संघर्षाचा फटका आणि नुकसान त्यांनीही सहन केले, पण कधीही त्याची जाणीव मला होऊ दिली नाही. अनेक राजकीय ऑफर्स नाकारून त्यांनी माझ्यावर निष्ठा दाखवली. माझ्यावर किंवा दीपक केसरकर यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक टीकेला जिल्ह्यातून सर्वात पहिले उत्तर संजू परबच देतात. त्यांनी माझ्यासाठी जे केले आहे, त्याची परतफेड मी आयुष्यात नक्की करेन.”
दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्या योगदानाचा गौरव
यावेळी बोलताना त्यांनी २०२४ च्या निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. मला आमदारकीचे तिकीट आणि ‘एबी फॉर्म’ मिळवून देण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा वाटा होता, असा उल्लेख त्यांनी केला. तसेच, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रशासकीय अनुभवाचे आणि मंत्रालयातील वजनाचे कौतुक करताना संजू परब यांनी नेहमीच केसरकर यांच्या आदेशाचा मान ठेवल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल आणि संजय पडते यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी संजू परब यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.










