सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांसह त्यांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम गंगावणे, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, स्टेपिंग ग्लोबल स्कूलचे संचालक अँड. रुजूल पाटणकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, पत्रकार आनंद धोंड, माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुशील चौगुले, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न उर्फ बाळू देसाई, पर्यावरण संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष मानसी परब, डी. एस. जांभेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, “डिजिटल क्रांतीच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करावा. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी उपयोग करून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. मोठी स्वप्ने पाहा, ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्या. सिंधुदुर्गातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा मला विश्वास आहे.”
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाया मजबूत करण्याचे आवाहन केले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवावे, गुणवत्तेला प्राधान्य द्यावे तसेच डिजिटल साधनांचा योग्य वापर करून स्मार्ट शिक्षणाचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले. अवांतर वाचनाची सवय स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच उपयुक्त ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी पालकांनी मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करावे आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्गात गुणवंत विद्यार्थ्यांची कमतरता नाही, मात्र अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून त्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. अश्विनी लेले यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्यामध्ये सातत्याने मेहनत घ्यावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. रूपेश पाटील यांनी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, युवा विकास, शेती व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. दयानंद कुबल यांच्या नेतृत्वाखाली संस्था राज्यासाठी आदर्शवत कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिर्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर आभार प्रथमेश सावंत यांनी मानले.







