
मुंबई : प्रतिनिधी
संस्थानकालीन वैभव लाभलेल्या सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक ‘मोती तलावाचा’ जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होणार आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकासात्मक प्रकल्प राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्याला मुंबईतील मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत तत्त्वतः संमती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि उपस्थिती
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी मोती तलावाच्या सौंदर्यीकरण आणि विकासात्मक प्रकल्पाचा विशेष आराखडा (प्लॅन) तयार केला होता. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला खालील प्रमुख मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते:
यावेळी नितेश राणे (पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा),दीपक केसरकर (आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ),युवराज लखम सावंत-भोसले (सावंतवाडी संस्थान),श्रद्धा सावंत-भोसले (नगराध्यक्षा, सावंतवाडी),प्रकल्पाचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट आणि संबंधित शासकीय अधिकारी. यावेळी उपस्थित होते.
लवकरच सकारात्मक पावले उचलणार: पालकमंत्री नितेश राणे
या बैठकीत आर्किटेक्ट यांनी प्रकल्पाच्या डिझाईन आणि नियोजनाचे सादरीकरण केले. आराखडा पाहिल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.
“सावंतवाडी मोती तलावात जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला हा आराखडा अत्यंत योग्य आहे. या प्रकल्पामुळे सावंतवाडीच्या वैभवात भर पडेल. शासन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच सकारात्मक पावले उचलेल,” अशी ग्वाही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिली.
मोती तलावाचा हा जागतिक दर्जाचा प्रकल्प शहराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला मोठी गती देणारा ठरेल,!आमदार दीपक केसरकर
याप्रसंगी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, मोती तलावाचा हा जागतिक दर्जाचा प्रकल्प शहराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला मोठी गती देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, सावंतवाडी हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनणार आहे. या मंजुरीमुळे सावंतवाडीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.







