तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर; महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून, सर्वांच्या नजरा आता तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागल्या आहेत. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे.
जिल्हा परिषदेसाठी ‘तगडे’ आव्हान
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदिप गावडे आणि महाविकास आघाडीचे रुपेश राऊळ यांच्यात थेट आणि जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी अनुभवी आणि खबीर नेतृत्व असल्याने कोणाचे पारडे जड ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार अमेय पै यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, ते कोणाचे गणित बिघडवणार याची चर्चा रंगली आहे.
तळवडे गाव ठरणार ‘किंगमेकर’
या मतदारसंघाचे भवितव्य प्रामुख्याने तळवडे गावावर अवलंबून आहे. मतदारसंघातील सर्वाधिक मतदार याच गावात असल्याने, तळवडे ज्याच्या बाजूने उभे राहील, त्याचा विजय सुकर होणार आहे. यासोबतच निरवडे, मळगाव आणि नेमळे या गावांतील मतदारांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरेल.
पंचायत समिती: सभापती पदासाठी चौरंगी लढत
तळवडे पंचायत समिती मतदारसंघाचे सभापती पद आरक्षित असल्याने या जागेसाठी रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीसाठी तळवडे गावातूनच तगडे उमेदवार रिंगणात आहेत.श्वेता सुनील जाधव (महाविकास आघाडी).सुस्मिता सुधाकर जाधव (महायुती).काजल मोहन जाधव (अपक्ष).प्राजक्ता प्रकाश जाधव,तळवडे गावातील ४,९२७ आणि निरवडे गावातील २,५७३ मतदारांच्या हाती या उमेदवारांचे भवितव्य आहे.
मळगाव-नेमळे पट्ट्यात राऊळ विरुद्ध मुळीक
मळगाव पंचायत समिती मतदारसंघातही चुरस कमी नाही. येथे महाविकास आघाडीचे पांडुरंग राऊळ आणि महायुतीचे गौरव मुळीक यांच्यात थेट लढत होत आहे. मळगाव: ३,७६० मतदार नेमळे: १,८०० मतदार या दोन गावांतील मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, यावर मळगावचा निकाल अवलंबून असेल. दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.







