
राजकीय रणधुमाळी!
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध
खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका
आम्ही एवढे वर्ष पक्षाचे काम करून फायदा काय ?आम्हाला कधी संधी मिळणारं !माजी सरपंच प्रमोद गावडे
रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे, अन्य राखीव मतदारसंघातील काही मातब्बर नेते आता तळवडे मतदार संघावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती समोर येताच, स्थानिक कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. भाजपचे तळवडे मतदार संघातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती प्रियांका प्रमोद गावडे यांचे पती प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, तसेच रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव हे सध्या जिल्हा परिषद उमेदवारी करता इच्छुक आहेत. यावेळी माजी सरपंच प्रमोद गावडे म्हणाले आम्ही एवढे वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम केले आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल केला आहे.तर शिंदे शिवसेना पक्ष कडून जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, आमदार दिपक केसरकर याचे विश्वासू कार्यकर्ते सूरज परब हे सध्या रेस मध्ये आहेत या नेतेमंडळी शिवाय अजून काही कार्यकर्ते तळवडे, नेमळे, मळगाव या गावातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी “बाहेरील उमेदवार नकोच” अशी भूमिका घेतली आहे. “कोणी कितीही दबाव आणला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेरील उमेदवार स्वीकारणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत स्थानिक नेत्यांनी पक्षातील गटबाजीचे सूरही तीव्र केले आहेत. “आमच्याकडे सक्षम, अनुभवी कार्यकर्ते असताना बाहेरील व्यक्तीला संधी का?” असा स्पष्ट सवाल करत, स्थानिक विरुद्ध बाहेरील नेते असा संघर्ष या मतदारसंघात उफाळून येण्याची चिन्हे आहेत. “बाहेरचा उमेदवार आणल्यास आम्ही निष्क्रिय बसणार नाही,” असा थेट इशारा काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिल्याची माहिती आहे.









